रानपिंगळा (शास्त्रीय नाव: Athene blewitti अथेनी ब्लुइटी ; इंग्लिश: Forest Owlet, फॉरेस्ट औलेट;) हा पक्षी भारतातील महाराष्ट्र, व मध्य प्रदेश या राज्यात खूप मोठ्या प्रमाणात आढळत असे, पण आता विविध कारणास्तव तो दिसेनासा झाला आहे. अलीकडेच पक्षी अभ्यासकांच्या एका टीमने याचा शोध घेतला असता तो नंदुरबार जिल्ह्यात व मेळघाट अभयारण्यात केवळ २०० ते ३०० एवढ्याच संख्येने आढळला.[१]
खर्गला म्हणून संस्कृत या भाषेत ओळखला जाणारा हा पक्षी दिसायला शिंगी डुमासारखा, पण आकाराने मोठा व आखूड शेपटीचा असतो. तो पानगळीच्या आर्द्र जंगलात व ओढ्यानजीकच्या जुन्या आमरायांत आढळतो. पश्चिम खानदेश, सूरत, डांग, सातपुड्यापासून पूर्वीय मध्य प्रदेश व ओरिसातील संबलपूर जिल्ह्यात तो दिसतो अशी माहिती मारुती चितमपल्लींच्या पक्षिकोशावरून मिळते, पण आता हा पक्षी संकटात आहे. त्याविषयी माहिती देताना पक्षी अभ्यासक मीनाक्षी शर्मा म्हणाल्या की, तो पिंगळा गटातील अन्य पक्ष्यांप्रमाणे केवळ रात्रीच संचार करीत नाही, तर त्याला दिवसाही दिसते. तो निर्भयपणे इकडे तिकडे जंगलात, माळरानावर, ओढे-नद्यांकाठी फिरतो. पण त्याचा हाच गुण त्याच्या नाशाला कारण ठरत आहे. कारण इतर पिंगळ्यांना जसे अंधाराचे संरक्षण मिळते तसे ते याला मिळत नाही. दिवसाउजेडी तो एखाद्या छोट्या मोठ्या शिकाऱ्याकडून सहजी मारला जातो. तसेच या पक्ष्याच्या मांसाविषयी खवैयांमध्ये बरेच समज-अपसमज आहेत. त्यामुळे बाजारातही त्याला एकेकाळी खूप मागणी होती. आता हा पक्षीच संपत आला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या पक्षी अभ्यासकांच्या निरीक्षणात हा पक्षी सापडल्याची नोंद नाही, पण १९९७ साली प्रथमच तो दिसला. त्यामुळे आशा पल्लवित झालेले पक्षीप्रेमी आता तो वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत.
महाराष्ट्रातील पक्षीप्रेमींनी, पक्षी अभ्यासकांनी व मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटीने रानपिंगळा किंवा ‘फॉरेस्ट आउलेट' या पक्ष्याला महाराष्ट्राचा राज्यपक्षी करावा अशी शिफारस केली आहे. याआधी राज्यपक्षी म्हणून हरियाल या पक्ष्याला मान्यता दिली गेली होती. आता या रानपिंगळ्याचे नाव पुढे आले आहे.[२] हा पक्षी घुबड, पिंगळा गटातील आहे. रानपिंगळा दिसायला फारसा आकर्षक नसतो. मोर, पोपट, बगळा, करकोचा यासारखा तर नाहीच नाही. खरे तर मोरासारखा सुंदर व डौलदार पक्ष्याला पक्ष्यांचा राजा म्हणून आपण वर्षानुवर्षे ओळखतो, पण मग हरियालपाठोपाठ हे नाव पुढे आले आहे. यामागे त्या पक्ष्याला संरक्षण देऊन त्याची संख्या वाढवणे हा मुख्य उद्देश आहे; कारण हा पक्षी आता फारच दुर्मिळ होत चालला आहे. असेआल आह्ले पक्षी पृथ्वीतलावरूनच नाहीसा होईल व तो पुन्हा मिळवण्यासाठी एक तारांगण जाऊन दुसरे यावे लागेल. राजपक्ष्याचा याला दर्जा दिल्यास या पक्ष्याचा आणखी शोध घेणे, त्यावर अभ्यास करणे व वाचवण्यासाठी संरक्षण देणे शक्य होईल. म्हणून राजपक्ष्याच्या मान्यतेची मागणी झाली आहे.
रानपिंगळा (शास्त्रीय नाव: Athene blewitti अथेनी ब्लुइटी ; इंग्लिश: Forest Owlet, फॉरेस्ट औलेट;) हा पक्षी भारतातील महाराष्ट्र, व मध्य प्रदेश या राज्यात खूप मोठ्या प्रमाणात आढळत असे, पण आता विविध कारणास्तव तो दिसेनासा झाला आहे. अलीकडेच पक्षी अभ्यासकांच्या एका टीमने याचा शोध घेतला असता तो नंदुरबार जिल्ह्यात व मेळघाट अभयारण्यात केवळ २०० ते ३०० एवढ्याच संख्येने आढळला.